सांगली

खासदारांनी कुणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर टीका करू नये : आमदार अनिल बाबर

John Smith
Jun 19 / 2018

विटा : ज्यांनी न केलेल्याही कामाबरोबरच एकाच कामाची दोन - दोनदा प्रसिध्दी केली, प्रसिध्दीसाठी शौचालये आणि पीकअपशेडही ज्यांना पुरले नाहीत, अशांनी माझ्यावर प्रसिध्दीची टिका करू नये.मुळात टेंभू योजनेला ज्यांनी दिवास्वप्न म्हणून हिणवले, माझ्यासाठी ही योजना एक दिव्यस्वप्न राहीली, ही स्वप्नपुर्ती होत असताना केलेल्या कामाची प्रसिध्दी करण्यात गैर काय? असा सवाल माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना करत खासदार संजयकाकांनी कुणाला तर बरं वाटावं म्हणून बोलण्यापेक्षा खरं बोलावं असा सल्ला आमदार अनिल बाबर यांनी दिला. विटा नगरपालिकेत खासदार संजयकाका पाटील यांचा कृष्णा खोरे विकास मंहामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्यल सत्कार आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार पाटील व माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आमदार बाबर यांच्यावर टेंभू योजना व त्यासंदर्भातील प्रसिध्दी या अनुषंघाने टिका केली होती. आमदार बाबर यांनी या टिकेला आज पत्रकार परिषद घेवून चोख प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मुळात खासदार संजयकाकांचा सत्कार सोहळा असताना त्यांच्या कौतुकाचे दोन शब्द बोलणे अपेक्षीत होते परंतू अशाही कार्यक्रमात माझ्यावर टिका झाली म्हणजे विरोधकांना माझ्या कामाची धडकी भरली आहे आहे हे उघड आहे. आमदार बाबर म्हणाले, मी आजवर टेंभूसाठी कोणीच काही केले नाही अगर मीच एकटयाने सर्व काही केले असे कधीही म्हटलो नाही पण हे काम युती सरकारच्या काळात होत आहे. व युती सरकारचा प्रतिनिधी म्हणून सरकारच्या योजना व केलेली काम जनतेपर्यंत पोहचविणे हे माझे कर्तव्य व अधिकार आहे. विरोधकांच्या दहा वर्षाच्या काळातल्या नाकर्तेपणाचा पाढा मी कधीही वाचला नाही, टेंभू योजना होणारच नाही, हे दिवास्वप्न आहे असे म्हणणारी मंडळीच आता ही योजना माझ्या काळात पुर्ण होते आहे असे दिसताच माझ्यावर खासदार संजयकाकांचा आधार घेवून टिका करू लागली आहे, टेंभूसाठी मी काय करतो आणि काय केले याबाबत कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसून जनतेला सर्व ठावूक आहे जनता त्याचे योग्य मुल्यमापन करत असते.स्वप्नपूर्तीसाठी मला जे कष्ट करावे लागत आहेत ते लोकांच्या पर्यंन्त पोहचवणे मी गैर मानत नाही आणि मला न केलेल्या कामाची प्रसिध्दी करण्याची सवयही नाही. खासदार संजयकाका पाटील यांनीही कोणाला तरी बरं वाटावं म्हणून माझ्यावर बोलण्यापेक्षा तुम्ही खासदार आहात, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आहात, सत्तेवर तुमचा अंकुश आहे. त्यामुळे जबाबरदारीने माहिती घेवून खरं असेल ते बोलावं, चुकीच्या माहितीवर माझ्यावर टिका करू नये. मी किती बैठका घेतल्या याची माझ्याकडे आकडेवारी नसली तरी टेंभूच्या बाबतीत विरोधकांशी एकाच व्यासपीठावर येवून समोरासमोर करण्याची माझी तयारी आहे. हवे तर खासदारानी तसा प्रयत्न करावा, अशी मागणीही आमदार बाबर यांनी केली.