थोडक्यात महत्वाचे

सह्याद्री फार्मचे विलास शिंदे यांना नाशिक भूषण पुरस्कार जाहीर रोटरी क्लबतर्फे होणार सन्मान; पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी वितरण

John Smith
Jun 19 / 2018

*नाशिक :* रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा नाशिक भूषण २०१७-१८ पुरस्कार कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सह्याद्री फार्मर्स प्रोडयुसर कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक, विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. शुक्रवारी आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. नाशिक ही ज्यांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी आहे आणि ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:बरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले अशा व्यक्तींना नाशिक भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना १९९६-९७ पासून रोटरी क्लब ऑफ नाशिक राबवत आहे. रोटरी क्लबच्या पुरस्काराने याआधी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, शांताबाई दाणी, कुसुमताई पटवर्धन, वसंतराव गुप्ते, दादासाहेब पोतनीस, विनायकदादा पाटील, डॉ. वसंत पवार. बापू नाडकर्णी, बाबुभाई राठी, कृष्णराव वाईकर, बाळासाहेब दातार, सुधाकर भालेराव, बेंजन देसाई, जगुभाई सपट, गोरखभाई झवेरी, बाळासाहेब वाघ, विश्वासराव मंडलिक, डॉ. नरेंद्र जाधव, उत्तम कांबळे, डॉ. विजय काकतकर, देवेंद्र बापट, राजेंद्र बागवे, अमोल चिटणीस,विनायक गोविलकर शिक्षणमहर्षी डॉ. मो. स. गोसावी आदींना सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचे नाशिक भूषण विलास शिंदे यांची नाशिक ही कर्मभूमी आहे. नाशिकमधल्या आडगाव या गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले विलास शिंदे यांना लहानपणापासूनच कृषि क्षेत्रातकाहीतरी वेगळे करून पाहण्याची ओढ होती. ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात परिवर्तन घडावे, त्यांच्या जीवनपध्दतीत सुधारणा व्हावी यासाठी विलास शिंदे यांच्या संकल्पनेतून सह्याद्री फार्मर्स प्रोडयुसर्स कंपनी लि. या संस्थेचा जन्म झाला. अत्यंत अल्प काळातच व्यापक पायाभूत सोयीसुविधा आणि सुमारे ३०० कोटींच्या उलाढालीच्या रूपाने संस्थेने मोठी झेप घेतली. नाशिक येथून कृषिअभियांत्रिकी विषयात पदवी मिळवल्यानंतर त्यांनीमहात्मा फुले कृषी विद्यापीठातून सॉइल ऍंड वॉटर कॉन्झर्व्हेशन या विषयातून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. बी.टेक.मध्ये असतानाच विद्यापीठाजवळच भाडयाने शेतजमीन घेऊन शेतकरी म्हणून त्यांच्या प्रयोगांचा प्रारंभ सुरू केला. हाती असलेल्या साधनसामग्रीचा यथायोग्य वापर करत शेतीचा खर्च कमी करणे आणि नफा वाढविणे, उत्पादनाला जागतिक पातळीचा दर्जा देणे, उत्पादक ते ग्राहक ही साखळी अधिक मजबूत करणे अशी विविध उद्दिष्टे समोर ठेवून सुरुवात केलेल्या विलास शिंदे यांच्या कंपनीने द्राक्षांचे ११६२ कंटेनर पाठवीत भारतातील सर्वात मोठे निर्यातदार होण्याचा मान मिळविला. कृषी क्षेत्रात त्यांचे योगदान मोलाचे आहे. शिंदे यांना याआधी वसंतराव नाईकचा कृषी निर्यात पुरस्कार, अपेडा एक्स्पोर्ट अवॉर्ड, परिवर्तन दूत अवॉर्ड, स्मार्ट फार्मर अवॉर्ड, महाराष्ट्र मंडळ, लंडन, डॉ. आप्पासाहेब पवार प्रोग्रेसिव फार्मर पुरस्कारासह अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शुक्रवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यास नाशिककरांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप सिंग बेनीवाल, सचिव मनीष चिंधडे, नाशिक भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीनंदन भालेराव, यांच्यासह पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. श्रीया कुलकर्णी, हेमराज राजपूत, स्वाती मराठे, डॉ.जयंत वाघ आदींनी केले आहे.