थोडक्यात महत्वाचे

पंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद

MahaNews LIVE
Jun 19 / 2018

पंढरपूर : आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर विभाग शिवसेनेत मोठी खांदेपालट होण्याची शक्यता असून, पंढरपूर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुखपद पुन्हा एकदा पंढरपूरला मिळणार असल्याचे चर्चा सर्वत्र सुरू आहे. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आता एक वर्षावर आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी हे पक्ष सक्रिय झालेले आहेत. त्या तुलनेत पंढरपूर विभागात शिवसेनेत अजूनही शांतता असल्यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून आ. तानाजी सावंत यांची नेमणूक झाल्यानंतर त्यांनी निष्क्रीय पदाधिकार्‍यांना हटवून सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांवर नव्या पदांची जबाबदारी देण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचीही खांदेपालट केली जाणार असल्याचे दिसते. विद्यमान जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांना हटवून त्यांच्याजागी पंढरपूरच्या निष्ठावान शिवसैनिकाची नियुक्ती केले जाईल असे समजत आहे. आमदार सावंत यांच्या या प्रस्तावाला सेनेच्या वरिष्ठ नेत्यांसह मातोश्रीनेही संमती दिल्याचे समजते. पंढरपूर तालुक्याचे विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने मोठे महत्व आहे. हा तालुका 4 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो हे लक्षात घेऊन या भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी पंढरपूर तालुक्याला जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्याचे धोरण सेना नेतृत्वाने अवलंबल्याचे दिसते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात एकहाती शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षाचे निशाण फडकावत ठेवलेल्या तरूण नेत्याला जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन दिवसांत या बदलाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून, पंढरपूर तालुक्याला सेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुखपद पुन्हा एकदा मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ शिवसैनिक साईनाथ अभंगराव यांच्यानंतर दुसर्‍यांदा पंढरपूरकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद चालून येत असल्याच्या चर्चेमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये फारच उत्साह संचारला आहे.

पंढरपूरला मिळणार शिवसेनेचे जिल्हा प्रमुखपद
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *